रमाबाई कॉलनीतील अडांगळे उद्यान कचराकुंडी बनली; मनपाची उदासीनता, रहिवाशांचा संताप
रवि निषाद / मुंबई

मुंबई : घाटकोपर येथील रमाबाई कॉलनीतील कै. शंकरराव गेणूजी अंडागळे उद्यानाची दुरवस्था झाली असून, उद्यान हळूहळू कचराकुंडी बनत चालले आहे. देखभालीअभावी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
माहितीनुसार, हे उद्यान पूर्वी स्थानिक रहिवाशांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण होते. सकाळ-संध्याकाळी नागरिक येथे फेरफटका मारत, ज्येष्ठ नागरिक विश्रांती घेत आणि कुटुंबीय निवांत वेळ घालवत. उद्यानाची देखभाल दामू अंडागले करत होते; मात्र ते काही काळापासून आजारी असल्याने सध्या उद्यानाकडे लक्ष देणारा कोणी नाही. परिणामी, मद्यपान करणारे आणि समाजविघातक घटक येथे जमा होऊ लागले असून कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
रहिवाशांच्या तक्रारीनुसार, अशा प्रकारांना विरोध केल्यास संबंधितांकडून दमदाटी केली जाते. याबाबत पोलिसांना आणि मनपाच्या अधिकाऱ्यांना कळवूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या उद्यानाची जबाबदारी अंकुश वाजे या अधिकाऱ्याकडे असून, ते फोनला प्रतिसाद देत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
समाजसेवक लक्ष्मण जाधव उर्फ बाळू जाधव यांनी सांगितले की, सध्या संध्याकाळच्या वेळी उद्यानात सभ्य नागरिक येणे कठीण झाले आहे. महिलांना त्रास दिला जात असून कचरा टाकून लोक पसार होतात. ही परिस्थिती रोखण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रमाबाई कॉलनीतील रहिवाशांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उद्यानाची स्वच्छता, सुरक्षा आणि नियमित देखभाल सुरू करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.