डिजिटल अटकेच्या भीतीतून ११ कोटींची फसवणूक; सायबर गुन्हे शाखेच्या जाळ्यात दोन तरुण

Spread the love

डिजिटल अटकेच्या भीतीतून ११ कोटींची फसवणूक; सायबर गुन्हे शाखेच्या जाळ्यात दोन तरुण

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : ‘डिजिटल अटक’ करण्यात येईल, अशी थेट धमकी देत शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल पावणे अकरा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली. हर्षद सुभाष धनतोले (२३) आणि समर्थ सुरेश देशमुख (२४, दोघे सध्या रा. कर्वेनगर, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर संपर्क साधून स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. काळ्या पैशांच्या व्यवहारात बँक खात्याचा वापर झाल्याचा बनाव करत ‘डिजिटल अटक’ तसेच कुटुंबीयांनाही अटक होण्याची भीती घालण्यात आली. या दबावाखाली आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात तातडीने रक्कम भरण्यास भाग पाडले. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकाने १० कोटी ७४ लाख रुपये जमा केले.

फसवणूक उघडकीस आल्यानंतर शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. तपासादरम्यान संबंधित बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तसेच शहरातील विविध एटीएममधून रक्कम काढताना वापरलेले सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर सायबर पोलिसांनी धनतोले आणि देशमुख यांना अटक केली. त्यांच्याकडून चार लाख ७८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, खात्यातील ४० लाख रुपये गोठविण्यात आले आहेत.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या पथकाने केली. तपासात ईडी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आदी केंद्रीय तपास यंत्रणांची नावे वापरून नागरिकांना भयभीत करून कोट्यवधींची फसवणूक झाल्याचेही उघडकीस आले आहे.

‘डिजिटल अटक’ किंवा केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावाने येणाऱ्या धमकीच्या कॉल्सकडे दुर्लक्ष करावे आणि कोणत्याही दबावाखाली पैसे भरू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon