महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, एसपीनी दिली माहिती
योगेश पांडे / वार्ताहर
जळगाव – राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी मतदान होत असून काही महापालिका क्षेत्रात गटातटात आणि उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच,जळगावमध्ये गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे, याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली.
जळगाव शहरातील पिंपराळा परिसरामध्ये हवेत गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती असून दोन तरुणांमध्ये झालेल्या वादानंतर ही गोळीबाराची घटना घडली. त्यानंतर, पोलिसांचा मोठा फौजफाटा पिंप्राळा परिसरात दाखल झाला आणि गोळीबार नेमका कुठल्या कारणावरून झाला अद्याप स्पष्ट नाही.पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून गोळीबार करणाऱ्या तरुणांचाही शोध घेतला जात आहे. याप्रकरणी, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माहिती दिली. गोळीबारच्या घटनेवर पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पिंपराळा भागातील रहिवासी असलेले सचिन आणि मुस्तफा नामक तरुणांमध्ये आर्थिक विषयावरून वाद होता. त्यातून गोळीबारची घटना घडलेली. या घटनेचा मतदानाशी काहीही संबंध नाही.