शालेय विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, अँटीनार्कोटिक्स व महिला सुरक्षिततेबाबत जनजागृती
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत झोन–५, कासरवडवली पोलीस स्टेशन व ईगल ब्रिगेड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना सायबर क्राईमपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता तसेच महिला सुरक्षिततेसंदर्भातील कायदे व काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात तज्ज्ञ वक्त्यांनी सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाईन फसवणूक ओळखण्याचे मार्ग, संशयास्पद बाबी तात्काळ पोलिसांना कळविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. अँटीनार्कोटिक्स विषयावर बोलताना विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देण्यात आले, तसेच चुकीच्या संगतीपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला. महिला सुरक्षिततेबाबत स्वसंरक्षण, आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आणि कायदेशीर अधिकारांची माहिती देण्यात आली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जाणीव वाढून सुरक्षित व जबाबदार नागरिक घडण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.