आक्षेपार्ह रीलमुळे बदलापूरमध्ये तणाव; भाजप महिला आघाडी अध्यक्षांच्या मुलीवर गुन्हा, पक्षाने घेतली दखल
पोलीस महानगर नेटवर्क
बदलापूर : बदलापूर पूर्व परिसरात सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह रीलमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक महिला पदाधिकारी प्रतिभा जाधव यांच्या मुलीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रभू श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच परिसरात संतापाची लाट उसळली असून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
घटनेनंतर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी संबंधित तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर बदलापूर पूर्व भागातील काही दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रतिभा जाधव या बदलापूर पूर्वमधील भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या मुलीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या रीलमधील विधानांमुळे पक्षाची मोठी अडचण झाली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजपने तत्काळ कारवाई करत प्रतिभा जाधव यांचा पदभार काढून घेतल्याचे समजते.
दरम्यान, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी समाजमाध्यमावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली भाषा अत्यंत निषेधार्ह असून, अशा प्रकारची वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणतीही व्यक्ती कोणाच्या नात्यातील असली तरी अशा कृत्यांना माफी नाही, असेही त्यांनी नमूद केले.
भारतीय जनता पक्ष ने संस्कार, श्रद्धा आणि संविधानाचा सन्मान ही आपली भूमिका असल्याचे अधोरेखित करत संबंधित प्रकरणात तात्काळ कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली आहे.