प्रामाणिकपणाचा गौरव! डी-मार्टमध्ये सापडलेले सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांच्या मदतीने मूळ मालकाला परत
पोलीस महानगर नेटवर्क
अंबरनाथ (पश्चिम): डी-मार्ट अंबरनाथ (पश्चिम) येथे सापडलेले अंदाजे एक तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र प्रामाणिक नागरिक प्रसाद कांबळे यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता अंबरनाथ पोलीस ठाण्यात जमा केले. त्यांच्या या कृतीमुळे प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर उभा राहिला आहे.
पोलीस ठाण्यात मंगळसूत्र जमा झाल्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक व स्थानिक चौकशीच्या आधारे मंगळसूत्राच्या मूळ मालकाचा शोध घेण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर सदर मंगळसूत्र मूळ मालकाला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सुपूर्द करण्यात आले.
या घटनेमुळे प्रामाणिक नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील विश्वासाचे नाते अधोरेखित झाले असून, समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे. प्रसाद कांबळे यांच्या प्रामाणिकपणाचे तसेच तत्परतेने तपास करून मंगळसूत्र परत देणाऱ्या अंबरनाथ पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.