ठाणे महापालिका निवडणूक : १६ जानेवारीला ११ केंद्रांवर मतमोजणी
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होत असून त्यानंतर शुक्रवारी, १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. यासाठी विभागनिहाय ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून शहरातील विविध ठिकाणी मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.
माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक १, २, ३ व ८ साठी हिरानंदानी इस्टेट येथील न्यू होरायझन एज्युकेशन सोसायटीत मतमोजणी होईल. वर्तकनगर प्रभाग समितीतील प्रभाग क्रमांक ४, ५ व ७ साठी पोखरण रोड क्रमांक २ येथील स्व. बाबूराव सरनाईक जिम्नॅशियम सेंटरमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे.
लोकमान्य सावरकर प्रभाग समितीतील प्रभाग क्रमांक ६, १३, १४ व १५ साठी कोरस हॉस्पिटलजवळील महिला बचत गट भवन, तर वागळे इस्टेट प्रभाग समितीतील प्रभाग क्रमांक १६, १७ व १८ साठी शासकीय तंत्रनिकेतन, वागळे इस्टेट येथे मतमोजणी होईल.
नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतील प्रभाग क्रमांक १९, २०, २१ व २२ साठी ठाणा कॉलेज येथील विद्या प्रसारक मंडळाच्या पॉलिटेक्निक इमारतीत, तर उथळसर प्रभाग समितीतील प्रभाग क्रमांक १०, ११ व १२ साठी होली क्रॉस हायस्कूल हॉल येथे मतमोजणी होणार आहे.
कळवा प्रभाग समितीतील प्रभाग क्रमांक ९, २३, २४ व २५ साठी सह्याद्री हायस्कूल, कळवा येथे व्यवस्था करण्यात आली आहे. मुंब्रा व दिवा प्रभागांसाठी मौलाना अबुल कलाम स्टेडियम, कौसा येथे विविध मजल्यांवर मतमोजणी होणार असून प्रभाग क्रमांक २६ व ३१ साठी तळमजला, प्रभाग क्रमांक ३० व ३२ साठी पहिला मजला तर दिवा प्रभाग समितीतील प्रभाग क्रमांक २७, २८ तसेच २९ व ३३ साठी प्रेक्षक गॅलरीतील स्वतंत्र विभाग निश्चित करण्यात आले आहेत.
मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांचे प्रतिनिधी, मतमोजणी कर्मचारी व अधिकृत अधिकाऱ्यांनी ठरलेल्या वेळेत केंद्रांवर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.