मुंबईत महायुतीला सर्वत मोठा झटका; निवडणुकीआधीच ४ प्रभाग गमावले
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीला मोठा तांत्रिक आणि राजकीय फटका बसला आहे. बंडखोरी रोखण्यासाठी पाळलेली कमालीची गुप्तता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या अंगाशी आली असून, मुंबईतील ४ महत्त्वाच्या प्रभागांमध्ये महायुतीचा एकही अधिकृत उमेदवार रिंगणात नसल्याचे समोर आले आहे. यामुळे मतदानापूर्वीच महायुतीने या ४ जागा गमावल्याचे मानले जात आहे.
बंडखोरांना रोखण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्याच्या नादात महायुतीचे ४ प्रभागांत उमेदवारच उभे राहू शकले नाहीत. आता २२७ जागांपैकी महायुती केवळ २२३ जागांवर निवडणूक लढवणार आहे.
ज्या प्रभागांत उमेदवार नाहीत त्यात
प्रभाग २११ (दक्षिण मुंबई),प्रभाग २१२ (दक्षिण मुंबई),प्रभाग १४५ (ट्रॉम्बे-चिता कॅम्प) आणि प्रभाग १६७ (कुर्ला पश्चिम) चा समावेश आहे.
निवडणुकीत सहसा मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून ‘डमी’ उमेदवार दिला जातो. मात्र, यावेळी जागावाटपाचा पेच आणि नावांची गुप्तता पाळण्यासाठी उमेदवारांना रात्री उशीरा पक्ष कार्यालयात बोलावून एबी फॉर्म देण्यात आले. या घाईघाईत आणि गोपनीयतेत डमी अर्ज भरले गेले नाहीत, परिणामी तांत्रिक कारणांमुळे किंवा वेळेअभावी या ४ प्रभागांत महायुतीचे अधिकृत उमेदवार रिंगणाबाहेर गेले आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे चित्र असताना, मुंबईत मात्र ४ जागांवर उमेदवार नसणे ही नामुष्की असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे महापालिकेच्या मॅजिक फिगरपर्यंत पोहोचण्यासाठी महायुतीला आता उर्वरित २२३ जागांवर अधिक जोर लावावा लागणार आहे.