अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार!

Spread the love

अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार!

राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा; बहुमताचा आकडा पार

योगेश पांडे / वार्ताहर

अंबरनाथ – अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार असून शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चार नगरसेवकांनी आणि एक अपक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. अंबरनाथमध्ये शिवसेना २७ जागांवर सर्वात मोठा पक्ष आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार आणि अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्यासह शिवसेनेचे संख्याबळ ३२ पर्यंत वाढणार आहे. यामुळे अंबरनाथमधील राजकीय समिकरणं बदलणार आहेत.

अंबरनाथ नगरपरिषदेत ५९ जागा असून यात शिवसेनेचे २७ नगरसेवक विजयी झाले. भाजपचे १४, काँग्रेस १२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आणि १ अपक्ष उमेदवार निवडून आले होते. यानंतर भाजपने काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता. यासाठी अंबरनाथ विकास आघाडी असा गट स्थापन करुन त्याद्वारे सत्ता स्थापनेचा दावा ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता.

भाजपने काँग्रेसच्या नगरसेवकांचा पाठिंबा घेतल्यानंतर राज्यभरातून भाजपच्या निर्णयावर टीका झाली. यानंतर काँग्रेसकडून अंबरनाथमध्ये निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे पक्षातून निलंबन केले होते. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या १२ पैकी १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अंबरनाथमध्ये झालेल्या भाजप काँग्रेस आघाडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या आघाडीबाबत नाराजी व्यक्त करत भाजप नेतृत्वाने उत्तर द्यायला हवं असे म्हटले होते.

अंबरनाथच्या जनतेने विकासाला मतदान केले. त्यामुळेच शिवसेना २७ जागांसह सगळ्यात मोठा पक्ष म्हणून नगर पालिकेत समोर आला. भाजप-काँग्रेस आघाडीला अंबरनाथ जनतेने नाकारले असून त्यांचा विकासाचा कौल मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ४ आणि एका अपक्ष नगरसेवकांने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

या पाठिंब्यानंतर शिवसेनेचे संख्याबळ ३२ पर्यंत वाढले असून बहुमताचा आकडा पार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्यासह शिवसेनेकडून अंबरनाथमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला जाईल, असे सूत्रांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon