मुंबईत भाजप-शिंदे गटाची दोस्तीत कुस्ती!

Spread the love

मुंबईत भाजप-शिंदे गटाची दोस्तीत कुस्ती!

भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा; शिवसैनिक संतापले

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात भाजप आणि शिंदे सेनेची युती तुटल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. यानंतर आता मुंबईतही एकत्र निवडणूक लढवणाऱ्या या दोन्ही पक्षांमध्ये फूट पाडणारी एक घटना घडली. शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने येताना दिसले. याठिकाणी भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिवसेनेच्या पूजा कांबळे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत आहे. शुक्रवारी सकाळी या दोन्ही उमेदवारांचा प्रचार सुरु असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी माईकवरुन ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा दिल्या. आतापर्यंत ठाकरे गट ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा देऊन शिंदे गटाला डिवचत होता. मात्र, आपल्या मित्रपक्षानेच अशा घोषणा दिल्याने साहजिकच शिंदे सेनेचे कार्यकर्ते संतापले. त्यांनीही भाजपविरोधात घोषणा दिल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना मुंबईत भाजप आणि शिंदे गटात झालेल्या या भांडणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

शिवसेना-भाजपच्या जागावाटपात वॉर्ड क्रमांक १७३ हा शिंदे सेनेला सुटला होता. त्यामुळे शिंदे सेनेने येथून पूजा कांबळे यांना उमेदवारी दिली. मात्र, पूजा केळुस्कर यांनीही भाजपचा कलर झेरॉक्स असलेला एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज भरला होता. विशेष म्हणजे त्यांचा अर्ज वैधही ठरला होता. त्यामुळे शिंदे गटाने वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये नाईलाजाने मैत्रीपूर्ण लढतीला होकार दिला होता. मात्र, आता प्रचार सुरु झाल्यानंतर या वॉर्डमध्ये दोस्तीत कुस्ती होण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते या वादावर कसा तोडगा काढणार, हे बघावे लागेल.

दरम्यान, या सगळ्या प्रकाराविषयी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपचे कोण महारथी आहे त्यांना पाहावे लागेल. या घोषणा देण्यापूर्वी फडणवीस यांना विचारा, आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आहात. ज्यांनी घोषणा दिली त्यांची भाषा कुठे गेली ते बघा, याबद्दल फडणवीस दखल घेतील, अशी अपेक्षा संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी या घोषणेबाबत संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon