शेतकऱ्यांच्या शेळ्या आणि बोकड चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एक आरोपीला अटक तर २ आरोपी अद्याप फरार
योगेश पांडे / वार्ताहर
बारामती – बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या शेळ्या आणि बोकड चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून पोलिसांनी तब्बल १२ लाख ९५ हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या टोळीकडून लहान-मोठ्या अशा ३२ शेळ्या आणि बोकड पोलिसांनी जप्त करून चोरी झालेल्या शेतकऱ्यांना वाटप केले आहे, याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथून अशोक बाबुराव जाधव याला अटक केली असून अन्य दोन आरोपी फरार आहेत. अशोक बाबुराव जाधव यांच्यावर वडगाव निंबाळकर लोणंद आणि हडपसर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे देखील दाखल आहेत.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पिक अप गाडी मधून २ तलवारी, ३ कोयते, १ लोखंडी रॉड, १ स्क्रू ड्रायव्हर, १ तार कटर, १ चाकू, १ लाकडी काठी, १ प्लॅस्टीक पाईप आदी साहित्य जप्त केले आहे. सदर टोळी कडून आणखीन मोठे गुन्हे उघड होण्याची शक्यता वडगाव निंबाळकर पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सदोबाचीवाडी येथील इनामवस्तीवरील संजय जगन्नाथ होळकर या शेतकऱ्याचे चार बोकड आणि एक शेळी चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तिघांना पकडण्यात यश आले आहे. अजय सतीश होळकर, आर्यन सचिन माने आणि बंटी नंदकुमार घोडके अशी आरोपींची नावे आहेत. तिघांनाही गुरुवारी बारामती न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, त्यांच्याकडून आणखी तपास करत आहोत, ही माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिली.