वाशीतील ‘लिली स्पा’विरोधात गंभीर तक्रार; अल्पवयीन मुलींच्या शोषणाचा आरोप

नवी मुंबई : वाशी येथील सेक्टर २८ परिसरातील महावीर आर्केडमध्ये सुरू असलेल्या ‘लिली स्पा’ या मसाज पार्लरविरोधात अवैध देहव्यापार व अल्पवयीन मुलींच्या शोषणाबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. मसाज पार्लरच्या नावाखाली येथे तरुण व कथितपणे अल्पवयीन मुलींना ठेवून त्यांच्याकडून बेकायदेशीर व्यवसाय करून घेतला जात असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांनी केले आहेत.
कोपरी रोडवरील पद्मसागर सोसायटीजवळील शॉप क्रमांक २ मध्ये हा स्पा कार्यरत असून, थाय मसाज व इतर सेवांचे फलक लावून ग्राहकांना आकर्षित केले जाते, अशी माहिती तक्रारदारांनी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात येथे मसाजच्या आडून देहव्यापार सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे.
नवी मुंबई परिसरात गेल्या काही महिन्यांत अशा स्वरूपाच्या अनेक मसाज पार्लरवर पोलिसांनी छापे टाकून कारवाई केली आहे. वाशी, सानपाडा व नेरूळ परिसरातून देहव्यापाराच्या रॅकेट्स उघडकीस आले असतानाही अशा तक्रारी पुन्हा समोर येत असल्याने पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटकडे तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे आरोप असल्याने या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या तक्रारीबाबत नवी मुंबई पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. चौकशी सुरू करण्यात आली आहे का, तसेच संबंधित स्पावर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.