तीन वर्षांपासून फरार असलेले सराईत गुन्हेगार दोन भाऊ अखेर जेरबंद; कल्याण गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण पूर्व परिसरात गंभीर गुन्ह्यात सहभागी होऊन फरार झालेल्या सराईत गुन्हेगार असलेल्या दोन भावांचा शोध महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस अनेक दिवसांपासून घेत होते. मात्र सातत्याने शोधमोहीम राबवूनही हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने या दोन्ही आरोपींविरोधात जाहिरनामा प्रसिद्ध केला होता.
या प्रकरणाचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने हाती घेतला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. त्यानुसार भिवंडी जवळील काल्हेर गाव परिसरात सापळा रचून तब्बल तीन वर्षांपासून फरार असलेल्या या दोन्ही भावांना अटक करण्यात आली.
या अटकेमुळे कल्याण पूर्व परिसरातील गंभीर गुन्ह्यांचा तपास पुढे जाण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. पुढील तपास महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे.