सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह ८ जण हद्दपार

Spread the love

सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह ८ जण हद्दपार

योगेश पांडे / वार्ताहर

सांगली – सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी हद्दपारीची मोठी कारवाई केली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक ६ मधील सर्वसाधारण गटातील उमेदवार आझम काझीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. आझम काझीसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणातील टोळीतील आठ जणांवर हद्दपारीची कारवाई झाली. आज मिरजमध्ये अजित पवार यांची सभा होत असताना या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिल्याने भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये एकमेकावर गेल्या काही दिवसापासून जोरदार टीका होत होती.

कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारजण, आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन, विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोघावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी हे आदेश दिले आहेत. ऐन निवडणुकीत झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सध्या सुरु असणारी महापालिकेची निवडणूक तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख शोएब ऊर्फ मोहमद युसूफ साहेबपीर चमनमलीक काझी (३४), मतीन ऊर्फ साहेबपीर चलनमलीक काझी (३२), अक्रम महंमद काझी (४२), रमेश अशोक कुंजीरे (३९), अस्लम महंमद काझी, (४८), आझम महंमद काझी (३९), अल्ताफ कादर रोहीले (३६), मोहसिन कुंडीबा गोदड (२६) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. या सर्वांना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरज ऊर्फ रमजान मौला शेख (४४), शब्बीर मौल्ला शेख (२७), सौरभ विलास जावीर (२०), अर्जुन ईश्वरा गेजगे (३५) यांना सहा महिन्यांसाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजाराम सोपान बोडरे (४६) सुदाम सोपान बोडरे (४४) यांना सांगली जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जितेंद्र ऊर्फ जिच्या दगडु काळे (५२), रोहित किशोर पवार (१९), तोट्या ऊर्फ अक्षय जितेंद्र काळे या टोळीला सांगली, सोलापूर व सातारा या जिल्हयातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक निरीक्षक, पंकज पवार, मिरजेचे निरीक्षक किरण चौगले, कुपवाडचे सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे, विट्याचे निरीक्षक धनंजय फडतरे, आटपाडीचे निरीक्षक विनय बहीर, बसवराज शिरगुप्पी, दिपक गट्टे, स्था. गु. अ. शाखा, सांगली, गजानन बिराजदार, पोलीस ठाणे, अविनाश पाटील, विलास मोहिते, दादासाहेब ठोंबरे आदिनी या कारवाईत भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon