केदारनाथ दर्शनाचे आमिष; यवतमाळातील १२ भाविकांची साडेपाच लाखांहून अधिक रकमेची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
यवतमाळ : केदारनाथ दर्शनाचे आमिष दाखवून पांढरकवडातील एका व्यापाऱ्यासह १२ भाविकांची ५ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी मुंबईतील ‘वंडरलस्ट एक्सप्लोरर्स’ या ट्रॅव्हल कंपनीच्या संचालिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शास्त्रीनगर येथील रहिवासी राजेश शंकर कैलासवार (वय ५१) यांनी आपल्या १२ सहकाऱ्यांसह केदारनाथ यात्रेचे नियोजन केले होते. यासाठी त्यांनी मीरा रोड (मुंबई) येथील ‘वंडरलस्ट एक्सप्लोरर्स’ या ट्रॅव्हल कंपनीच्या संचालिका कादंबरी महेंद्र देवल यांच्याशी संपर्क साधला. नागपूर–दिल्ली विमानप्रवास, त्यानंतर केदारनाथसाठी खासगी बस तसेच मंदिर दर्शनासाठी हेलिकॉप्टर बुकिंग करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
या यात्रेसाठी कैलासवार यांनी टप्प्याटप्प्याने एकूण ५ लाख ७२ हजार रुपये संबंधितांच्या बँक खात्यात जमा केले. मात्र, प्रवासाची तारीख जवळ येऊनही कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. चौकशी केल्यानंतर आरोपीने युद्धजन्य परिस्थितीचे कारण देत यात्रा रद्द झाल्याचे सांगून भाविकांची दिशाभूल केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी राजेश कैलासवार यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यावरून पोलिसांनी कादंबरी महेंद्र देवल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.