१५ जानेवारीला मतदान करण्याचे केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांचे आवाहन
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी नागरिकांनी मतदान करून आपला लोकशाही हक्क बजावावा, असे आवाहन महापालिका निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अभिनव गोयल यांनी केले. गुरुवारी स्थायी समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, कल्याण परिमंडळ-३चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, निवडणूक विभागाचे उपआयुक्त समीर भुमकर तसेच आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीचे समन्वय अधिकारी बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.
महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ साठी एकूण १,५४८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, नऊ ठिकाणी स्ट्राँगरूम उभारण्यात येणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी क्र. १ ते ९ यांच्या अधिनस्त असलेल्या मतमोजणीची प्रक्रिया आठ ठिकाणी पार पडणार आहे. मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, १,१८२ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत मतदार स्लिपचे वितरण केले जाणार आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी महापालिका पूर्णतः सज्ज असून, १७० झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक कंट्रोल युनिट (CU) तसेच उमेदवारांच्या संख्येनुसार बॅलेट युनिट (BU) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदान केंद्रात नागरिकांना मोबाईल फोन नेण्यास मनाई असल्याची माहिती आयुक्त गोयल यांनी दिली.
दरम्यान, मतदान व मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले. मतदानपूर्व, मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीदरम्यान पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.