प्रचारादरम्यान युवकावर हल्ला; पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ
पोलीस महानगर नेटवर्क
नागपूर : राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असून प्रचारादरम्यान हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. अपहरण, खून यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असतानाच, मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरातही गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत असल्याची बाब समोर आली आहे.
दक्षिण नागपुरातील प्रभाग क्रमांक ३१ मध्ये प्रचार करत असताना एका युवकावर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली. योगेश काळे असे जखमी युवकाचे नाव असून, तो अपक्ष उमेदवार पूजा मानमोडे यांचा प्रचार करत होता. प्रचारादरम्यान वादातून सुरू झालेल्या बाचाबाचीनंतर संबंधित कार्यकर्त्यांनी योगेश काळे यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना चालणे-बसणेही अशक्य झाले होते.
जखमी अवस्थेत योगेश काळे यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच पोलिसांनी त्यांना कोतवाली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले. मात्र, यावेळी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याऐवजी जखमी युवकालाच दमदाटी केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया लांबलचक असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसून राहावे लागेल, असे सांगत पोलिसांनी जखमी युवकाला अप्रत्यक्षपणे धमकावल्याचे सांगण्यात येते. घटनेनंतर बराच वेळ लोटूनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून संबंधित आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.