कळव्यात ‘तळमजला + ८’ अनधिकृत इमारत; कारवाई शून्य, आयुक्तांना कायदेशीर नोटीस
पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : कळवा येथील शास्त्रीनगर परिसरात शकुंतला निवास शेजारी सुरू असलेल्या तळमजला + ८ मजली अनधिकृत व धोकादायक बांधकामावर ठाणे महानगरपालिकेने अद्याप ठोस कारवाई न केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी दैनिक ‘पोलीस महानगर’चे कार्यकारी संपादक व श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश संकपाळ यांनी महानगरपालिका आयुक्तांना कायदेशीर नोटीस / अंतिम स्मरणपत्र (क्रमांक २) बजावले आहे.
१० डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या मूळ तक्रारीनंतर २२ डिसेंबरला स्मरणपत्र सादर करूनही स्थळ तपासणी, कामबंद आदेश, सीलिंग किंवा पाडकाम अशी कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही. ही बाब प्रशासकीय निष्क्रियतेचे (Administrative Inaction) ठळक उदाहरण असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
सदर बांधकाम महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६, महानगरपालिका अधिनियम व राष्ट्रीय भवन संहिता (NBC) यांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप असून, सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या अनधिकृत बांधकामविरोधी आदेशांनाही धाब्यावर बसवण्यात आले असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वेळेत कारवाई न झाल्यास नागरिकांच्या जीवितास धोका, आर्थिक फसवणूक आणि भविष्यात दुर्घटना घडल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर वैयक्तिक जबाबदारी निश्चित होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
नोटिशीद्वारे ७ दिवसांत तात्काळ स्थळ तपासणी करून कामबंद आदेश, सीलिंग, आवश्यक असल्यास पाडकाम, तसेच बांधकामधारक व जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई करून त्याची लेखी माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा उच्च न्यायालयात रिट याचिका, लोकायुक्त/राज्य शासनाकडे तक्रार आणि स्वतंत्र फौजदारी कार्यवाही करण्याची पूर्वसूचना देण्यात आली आहे.
ही नोटीस वैयक्तिक हितासाठी नव्हे, तर सार्वजनिक सुरक्षितता व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी असल्याचे स्पष्ट करत, प्रशासनाने तातडीने कायदेशीर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.