कोळसेवाडी पोलिसांकडून २८ हरविलेले मोबाईल नागरिकांना परत
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिसेंबर २०२५ दरम्यान नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. CEIR ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास करत कोळसेवाडी पोलिसांनी एकूण २८ मोबाईल हस्तगत केले असून त्यांची अंदाजे किंमत ५ लाख ३१ हजार ६०० रुपये आहे.
हे सर्व मोबाईल गुरुवारी (८ जानेवारी) कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आयोजित हस्तांतरण समारंभात नागरिकांना परत करण्यात आले. या वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागाचे श्री. कल्याणजी घेटे उपस्थित होते. हरविलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत कोळसेवाडी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले.
ही कामगिरी परिमंडळ ३ कल्याणचे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुख आणि पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस हवालदार एन. डी. दळवी (३१९३) आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे ही कारवाई यशस्वीरीत्या केली.
हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी CEIR पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी यावेळी केले आहे.