भिवंडी येथील १९.४५ कोटींच्या कारवाईचा धागा पकडून पुणे एफडीएची मोठी कारवाई; ३२ कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यात प्रतिबंधित वस्तूंवर कारवाईसाठी कठोर आदेश दिल्यानंतर आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही याचा आढावा घेतला जात असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर प्रतिबंधित वस्तूंच्या उत्पादना विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. याच कारवाई अंतर्गत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टाकवे येथील ‘मे. सोएक्स इंडिया प्रा. ली.’ या कंपनीवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाने तब्बल ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोणपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही कारवाई २ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली. यापूर्वी १ डिसेंबर २०२५ रोजी या कंपनीच्या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मुंबईतील अन्न विश्लेषकांच्या अहवालानुसार, या नमुन्यांमध्ये ‘निकोटिन’ पॉझिटिव्ह आढळले. हे उत्पादन मानवी आरोग्यास घातक असून महाराष्ट्र सरकारने १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारे असल्याचे स्पष्ट झाले.
एकूण किंमत ३१ कोटी ६७ लाख,२१,९८७ रुपयांचे विविध फ्लेवर्सचे तयार हुक्का प्रॉडक्ट्स, कच्चे पदार्थ आणि फ्लेवर्सचा साठा जप्त करून कंपनीच्या दारांना सील ठोकले आहे.अनिल कुमार चौहान, असिफ फाजलानी, फैजल फाजलानी , मे. सोएक्स इंडिया प्रा. ली. कंपनी या व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३(५), १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या विविध कलमांनुसार (कलम ३०, २६, २७, ५९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे ३१ डिसेंबर रोजी झालेल्या १९.४५ कोटींच्या कारवाईचा धागा पकडून पुणे एफडीएने ही मोठी साखळी उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईमुळे प्रतिबंधित सुंगधित तंबाखू आणि हुक्का माफियांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस निरीक्षक अभिजित सुभाष देशमुख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. जळगाव जामोद महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वनविभागाच्या तपासणी नाक्यावर वनविभागाने सप्त्तर्कतेने मोठी कारवाई करत मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा तब्बल ७५ लाख रुपये, किमतीचा विमल गुटखा व पान मसाला जप्त केला.
महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या सुगंधी तंबाखू आणि हुक्क्यावर बंदी घातली असतानाही, त्याचा मोठा साठा दडवून ठेवणाऱ्या ‘मे. हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी’ या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने ३० डिसेंबर २०२५ रोजी छापा टाकला आहे. भिवंडीतील दापोडे परिसरातून तब्बल १९ कोटी ४५ लाख ७६ हजार ३२० रुपये किमतीचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त करण्यात आला आहे. १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या ‘अफजल’ ब्रँडच्या हुक्का नमुन्यांच्या तपासणी अहवालात निकोटिनचे प्रमाण आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. हा पदार्थ मानवी सेवनासाठी अपायकारक असल्याचे अन्न विश्लेषकांनी घोषित केले होते.