ठाण्यात पुन्हा ‘लाव रे तो व्हिडिओ’ चर्चेत!
बिनविरोधसाठी मविआच्या उमेदवारांना दमबाजी; अविनाश जाधवांनी व्हिडिओ दाखवत थेट पोलीसांवर केला आरोप
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी थेट दबाव, पोलिस यंत्रणेचा गैरवापर आणि सत्तेचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप मनसे व ठाकरे गटाने केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आमच्या उमेदवाराला एका पोलिस अधिकाऱ्यामार्फत नेण्यात आल्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे, असा दावा मनसे नेते अविनाश जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी पत्रकार परिषदेत केलाय.
ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी एका पोलिस अधिकाऱ्यामार्फत आमच्या उमेदवाराला नेण्यात आल्याचा व्हिडिओ आमच्याकडे असल्याचा दावा मनसे नेते अविनाश जाधव आणि ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केला आहे.
अविनाश जाधव पत्रकार परिषदेत म्हणाले की, विक्रांत घाग नावाचा मुलगा आहे, त्याच्याबरोबर एक पोलिस ऑफिसर आहे, जो एकनाथ शिंदे यांच्या घरी चाललेला आहे, बंगल्यावर चालला आहे. पोलिसांचा वापर केला गेला. पैशांचा वापर केला गेला. शिवसेनेच्या चिन्हावर लढलेला मुलगा आहे. त्याने फॉर्म भरला होता आणि हा मुलगा काय करतोय, त्याच्यासोबत पोलिसवाला एकनाथ शिंदे यांच्या घरी काय करतोय? याची चौकशी नको का व्हायला? हा प्रूफ आहे, आम्ही प्रूफ देतोय. यानंतर निवडणूक आयोगाला प्रूफ लागत असेल तर आम्ही ते देखील द्यायला तयार आहोत. आमचा उमेदवार, त्याला एक पोलीस अधिकारी एकनाथ शिंदे यांच्या घरी घेऊन गेलेले आहेत. नंतर त्याने जाऊन अर्ज मागे घेतलेला आहे. याचा देखील तुम्ही टाईम मॅच करू शकता की, तो त्यांच्या घरी कधी गेला आणि तिकडनं अर्ज कधी माघारी घ्यायला गेला. ही संपूर्ण निवडणूक पोलिसांच्या दबावाखाली पैशांनी लढवली जात आहे, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत व्हिडीओ दाखवत केलाय.
अविनाश जाधव पुढे म्हणाले की, वागळे विभागातील ज्या आरो आहेत, वृषाली पाटील आणि सत्वशिला शिंदे या दोघींची चौकशी होणे गरजेचे आहे. त्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं की, माझ्याकडून चुकी झाली. अकराच्या आधी फॉर्म डिस्प्ले करायचे होते, तिने साडेतीन वाजता फॉर्म डिस्प्ले केले. साडेतीन वाजता डिस्प्ले केलेला जो फॉर्म होता, तो देखील चुकीचा होता. त्याची देखील त्यांनी माफी मागितली. अशाप्रकारे जर एखादी अधिकारी निवडणूक यंत्रणा राबवत असेल तर ते चुकीचे आहे. ठाण्यातील जे तीन बिनविरोध निवडून आलेत, हे त्या महिलेच्या इथलेच आलेत. तिथले जेवढे अपक्ष उमेदवार होते, त्यांचे फॉर्म का पाठीमागे घेतले गेले? ते फॉर्म का रद्द झाले? त्यांना का अपात्र ठरवण्यात आले. या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होऊ शकणार नाही. नवीन आरोची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली. तसेच पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांचा “पाहुणचार केला जाईल” आणि अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांचाही चांगला समाचार घेतला जाईल, असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला आहे.