छिन्नविच्छिन्न अवस्थेमध्ये सापडलेल्या महिलेच्या हत्येचं गूढ उकलण्यात सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश; पती व सासऱ्याला अटक

Spread the love

छिन्नविच्छिन्न अवस्थेमध्ये सापडलेल्या महिलेच्या हत्येचं गूढ उकलण्यात सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश; पती व सासऱ्याला अटक

योगेश पांडे / वार्ताहर

सांगली – सांगलीच्या मिरजमधील टाकळी मध्ये छिन्नविच्छिन्न अवस्थेमध्ये सापडलेल्या महिलेच्या हत्येचं गूढ उकल्यात सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. मयत महिलेचा दुसरा पती व सासऱ्याने तिच्या त्रासाला कंटाळून व चारित्र्याला वैतागून तिची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी संबंधित महिलेच्या दुसऱ्या पतीला हरियाणामधून आणि सासर्‍याला उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे.

सांगलीच्या मिरजमधील टाकळीमध्ये एका उसाच्या शेतात महिलेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडला होता. याचा तपास करीत असताना मृतदेहाच्याशेजारी काही अंतरावर पोलिसांना रेल्वे तिकीट सापडले होते. महिलेची पूर्णतः ओळख पटलेली नसताना देखील केवळ रेल्वे तिकिटाच्या आधारावर सांगली गुन्हे शाखेने या हत्येचा छडा लावला आहे. उत्तर प्रदेश येथील जौनपूर येथे राहणारे मयत महिला नीतू उर्फ शालिनी यादव हिचा दुसरा पती आकाश उर्फ विशाल दीनदयाळ यादव व तिचा सासरा दिनदयाळ रामबाली यादव या दोघांनी मिळून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

मयत महिला नीतू उर्फ शालिनी ही पहिल्या पतीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथील आकाश उर्फ विशाल याच्यासोबत तिची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांनी कुटुंबाला याची कल्पना न देता विवाह केला होता. यानंतर कुटुंबामध्ये वारंवार होणाऱ्या वादातून महिलेनं दुसऱ्या पतिविरोधात पोलीस तक्रार केली होती. याचा राग आकाश उर्फ विशाल याच्या मनात होता.

पत्नीकडून वारंवार होणारा त्रास तसेच तिच्या चारित्र्याला वैतागलेल्या आकाश उर्फ विशाल याने वडील दीनदयाळ यांना सोबत घेऊन तिला उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथून १६ डिसेंबर २०२५ रोजी सांगलीच्या मिरजमधील टाकळी येथे रेल्वेने आणले. त्यानंतर शॉलने तिचा गळा आवळून हत्या करून पुन्हा रेल्वेने उत्तर प्रदेशला पलयन केलं होतं. घटनास्थळी सापडलेल्या केवळ रेल्वे तिकिटावरून व मिरज रेल्वे स्टेशनबाहेर चिक्की विक्रेत्याकडे केलेल्या आर्थिक व्यवहारावरून माग काढत स्थानिक गुन्हे शाखेने आकाश उर्फ विशाल याला हरियाणामधून तर दिनदयाळ यादव याला उत्तरप्रदेश मधून अटक केलीय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon