माजी महापौर शुभा राऊळ यांचा उबाठाला जय महाराष्ट्र; भाजपमध्ये प्रवेश करणार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – ऐन निवडणुकीच्या धामधुमीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईच्या माजी महापौर आणि शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा शुभा राऊळ यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला. शुभा राऊळ यांनी भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली असून त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
माजी महापौर शुभा राऊळ यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पत्र दिलं आहे. त्यांनी शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षपदाचा आणि शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. शुभा राऊळ यांच्या नाराजीचं कारण अद्याप समोर आलं नाही. अगदी थोडक्या शब्दांमध्ये शुभा राऊळ यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शुभा राऊळ आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
शुभा राऊळ यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. त्यानंतर शुभा राऊळ या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.शुभा राऊळ या ठाकरेंच्या शिवसेनेच्या एक मोठ्या महिला नेत्या मानल्या जातात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या युतीचा वचननामा जाहीर केला असताना त्याच दिवशी शुभा राऊळ यांनी राजीनामा दिल्याने तो ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय.