भाजप उमेदवारांकडून ओवाळणीतून मतदारांना पैसे वाटप; काँग्रेसच्या आरोपाने खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप भाजप उमेदवारांवर करण्यात आला आहे. वसई विरार महापालिकेच्या निवडणूक प्रचारावेळी ओवाळणीतून मतदारांना पैसे देत असल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. ओवाळणीच्या नावाखाली भाजप उमेदवार मतदारांना पैसे देत असल्याची तक्रार काँग्रेस नेत्याने निवडणूक आयोगाकडे केली आहे. प्रभाग क्रमांक १५ मधील काँग्रेस उमेदवार निखिलेश उपाध्याय यांनी निवडणूक आयोगाच्या विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.
प्रभाग क्रमांक १५ मधील भाजप उमेदवार चंद्रकांत गोरिवले, योगेश सिंह आणि रितू सचिन चौबे प्रचारावेळी ओवाळणीच्या नावाखाली पैसे देत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये उमेदवार चंद्रकांत गोरिवले यांनी खिशातून पैसे काढून एका महिलेच्या आरतीच्या ताटात ठेवताना स्पष्टपणे दिसत आहे.
या प्रकारामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप होत असून प्रकरणाची तातडीने चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक १५ मधील काँग्रेस उमेदवार निखिलेश उपाध्याय यांनी या व्हिडिओच्या आधारे निवडणूक आयोगाच्या विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून या ‘पैसे वाटपाच्या ओवाळणी फंड्या’मुळे निवडणूक वातावरण तापलं आहे.