भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही; मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाल्याचा आरोप केला. शहरात लुटारुंची टोळी दिवसाढवळ्या वावरतेय, असं अजित पवार म्हणाले. याच पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या माध्यमातून शरद पवार विकासकामं केल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
अजित पवार म्हणाले, फेब्रुवारी २०२५ मध्ये निवडणूक व्हायला पाहिजे होती. पुणे शहर बदलत गेलं, मला अनेक नेत्यांनी आशिर्वाद दिले. १९९२ ची निवडणूक लढवली तेव्हापासून सगळ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम काम करू लागलो. २०१७ मध्ये मात्र मोदी लाट आली आणि अनेक जण बाजूला गेले. १९९२ ते २०१७ पर्यंत मी पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट केला. हवा तो विकास केला. मात्र २०१७ साली एक लाट होती. त्यावेळी विठ्ठल मूर्ती घोटाळा झाल्याचा आरोप केला गेला, आता त्यावेळी ज्या महापौरांच्या काळात हे झालं, आज ते महापौर आमच्या विरोधात लढणाऱ्या (भाजप) पक्षात गेलेत, असं अजित पवार यांनी म्हटलं. शरद पवारांनी पिंपरीत विकासाला कशी गती दिली, हे सांगताना अजित दादांनी पवार साहेबांचं कौतुक केलं.
भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप
अजित पवारांनी भाजपवर या पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला. २०१७ पूर्वी पिंपरी पालिकेच्या ४८४४ कोटी होत्या. आज या ठेवी २००० कोटींवर आल्यात. मुळात या ठेवी वाढायला हव्या होत्या. इतकंच नव्हे तर कर्ज रोखे काढून कोट्यवधी कर्ज केलं. आता एवढा पैसा खर्च केला तर मग काम दाखवा ना?, असा सवाल अजित पवारांनी केला.भाजपच्या सत्ता काळात रिंग करुन पैसे लाटले गेले.रस्ते अरुंद केल्यानं वाहतूक कोंडी झाली. आमच्या काळात सुसाट प्रवास होत होता, असं अजित पवार म्हणाले.
भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही, असाही गंभीर आरोप अजित पवार यांनी केला. हफ्तेखोरी ही सुरु असल्याचा दावा करत अजित पवारांनी पुरावे असल्याचं म्हटलं. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावलेली आहे.अनेक रस्त्यावर अतिक्रमण झालंय, तिथं हफ्तेखोरी सुरु असल्याचं दिसतं.गेल्या नऊ वर्षात भाजपच्या सत्ता काळात हा असला विकास झालाय. टेंडर मध्ये रिंग केली जाते, दादागिरी केली जाते. मी पुरावे देईन. पुराव्या शिवाय मी बोलणार नाही, कोणावर बिनबुडाचे आरोप करणार नाही, असं अजित पवार म्हणाले.
महापालिका कर्जबाजारी केली
अजित पवारांनी यावेळी भाजपच्या स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत.शहरातील काहींच्या प्रॉपर्टी कशी काय वाढली? कुठून पैसा आला असा सवाल अजित पवारांनी केला. महापालिकेची धुलाई केली. सत्तेची मस्ती, माज आणि नशा आलीये अशा शब्दात अजित पवारांनी टीकास्त्र सोडलं. कुत्र्याच्या नसबंदीत ही पैसे खाल्ले, अरे कशात पण पैसे खाल्लेत. महापालिकेची अक्षरशः धुलाई केली,आत्ता ही अर्ज मागे घेण्यासाठी आमच्या उमेदवारांवर दबाव आणले गेलेत. सत्तेची मस्ती, माज आणि नशा आलेली आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करत अजित पवारांनी भ्रष्टाचाराने महापालिका पोखरली, कर्जबाजारी केली असल्याचा आरोप तत्कालीन सत्ताधारी भाजपवर केला.
स्थायी समितीचे अध्यक्ष असताना नितीन लांडगे यांना अटक केली. महापालिकेच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं. पण, भाजपच्या २०१७ ते २०२२ च्या सत्ताकाळात हे घडलं.पिंपरीत खोदाई माफिया झालेत. आजवर लँड माफिया, भंगार माफिया आता पिंपरी चिंचवड मध्ये खोदाई माफिया फोफावली आहे. जिओ, एअरटेल, व्होडाफोन अशा कंपन्या राजरोसपणे खड्डे खणतात. शहरात लुटारूंची टोळी दिवसाढवळ्या वावरत आहे, असा आरोप अजित पवारांनी केला.
बिनविरोध साठी उमेदवारांचा सिनेस्टाईल पाठलाग करण्यात आला. सिनेस्टाईल ने पाठलाग करत एका उमेदवाराला पकडले, गाडीत घातले आणि त्याचा अर्ज मागे घ्यायला लावला, असा आरोप अजित पवारांनी केला.