महेंद्रा कंपनीतील कामगार प्रवास करत असलेल्या खासगी बसचा ताम्हिणी घाट परिसरात भीषण अपघात; दुर्घटनेत सुमारे ५२ प्रवासी जखमी

Spread the love

महेंद्रा कंपनीतील कामगार प्रवास करत असलेल्या खासगी बसचा ताम्हिणी घाट परिसरात भीषण अपघात; दुर्घटनेत सुमारे ५२ प्रवासी जखमी

योगेश पांडे / वार्ताहर

रायगड – माणगाव तालुक्यातील ताम्हिणी घाट हा दिवसेंदिवस अपघाताचे केंद्रबिंदू ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. २ जानेवारी रोजी ताम्हिणी घाट परिसरात एका खासगी बसचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत सुमारे ५२ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर, प्रवाशांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ताम्हिणी घाटातील गारवा हॉटेलच्या पुढे असलेल्या तीव्र उतारावरून बस जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. उतारावर वेग वाढल्याने बस थेट समोरच्या डोंगरावर जाऊन आदळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, बसच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराड झाला. अपघातग्रस्त बसमधून भोसरी येथील महेंद्रा कंपनीतील कामगार प्रवास करत होते, अशी माहिती आहे. हे कामगार पुण्याच्या दिशेकडून माणगावच्या दिशेने येत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती आहे. या अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले.

या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमी प्रवाशांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी गंभीर जखमी असलेल्या काही प्रवाशांना पुढील उपचारांसाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, या अपघातामुळे ताम्हिणी घाट मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णतः विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त बस रस्त्याच्या कडेला हलवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. ताम्हिणी घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

माणगाव पोलिस स्टेशनकडून या अपघाताचा अधिक तपास सुरू असून, बसचा वेग, तांत्रिक बिघाड तसेच रस्त्याची स्थिती यांचा तपास करून अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे. ताम्हिणी घाटात अपघात रोखण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon