नाराज इच्छुक उमेदवारांकडून भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर नाराजी; वसईत रविंद्र चव्हाण समोरच ज्येष्ठ कार्यकर्त्याचा संताप

Spread the love

नाराज इच्छुक उमेदवारांकडून भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर नाराजी; वसईत रविंद्र चव्हाण समोरच ज्येष्ठ कार्यकर्त्याचा संताप

योगेश पांडे / वार्ताहर

पालघर – वसई-विरार महापालिकेच्या पार्श्वभूमीवर वसईत आज भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आले. पण रविंद्र चव्हाण कार्यक्रमस्थळी दाखल झाले तेव्हा पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते निशिकांत म्हात्रे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. त्यांनी रविंद्र चव्हाण यांच्या ताफ्यासमोरच संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. यावेळी भाजपच्या इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला. पण ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी माध्यमांसमोर येत यावेळी भूमिका मांडली.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या समोर भाजपच्या ज्येष्ठ निष्ठावान कार्यकर्त्याने संताप व्यक्त केला. तिकीट वाटपात जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना विचारात घेतलं नाही. चाळ माफिया आणि पक्षात नव्या आलेल्यांना तिकीट विकले गेल्याचा आरोप त्यांनी केला. निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना डावलले असं म्हणत जुचंदर येथील भाजपचे जुने कार्यकर्ते निशिकांत म्हात्रे यांनी संताप व्यक्त केला. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात कुणीही भाजपचा झेंडा घेत नव्हता तेव्हापासून आम्ही सक्रीय आहोत, असं म्हणत निशिकांत म्हात्रे यांनी संताप व्यक्त केला.

“१९७७ मध्ये आणीबाणी आली. आम्ही १९८० सालापासून भाजपचं काम करत आहोत. आयुष्यात मी बरबाद झालो. काय झालं म्हणजे काय? का तुम्ही आम्हाला फसवलं? त्यांच्या विश्वासावर १९८० सालापासून काम करतोय. आज ती माकडं काय आली, तुम्ही त्यांना तिकीटं दिली? कोणत्या आधावर दिली?”, असे सवाल निशिकांत म्हात्रे यांनी केले.

भाजप पक्षाचा झेंडा हाती घेण्याची कुणाची हिंमत नव्हती त्यावेळी निशिकांत म्हात्रे, अरुण पाटील, कैलास म्हात्रे या लोकांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. वयाच्या २५ वर्षापासून भाजप पक्षात काम करतोय. आम्हाला वसईचे सावत्र आमदार मिळाला. वसई तालुक्यात १८ कार्यकर्ते होते. आता जास्त झाले. ३ आमदार आले म्हणून आता सगळं गाव आलं. पण त्यावेळी कुणी नव्हतं. त्यावेळी सगळे घाबरत होते. पक्षासाठी आमचे प्राण गेले. पण आम्ही पक्ष जगवला. आम्ही तिकीट मागितलंच नाही. पण आम्हाला विश्वासात घेतलं नाही. कारण इकडने जे आमदार आहेत स्नेहा दुबे त्यांनी आमचा घात केला. जे सात महिन्यांआधी पक्षात आले त्यांना तुम्ही तिकीट दिलं”, अशी टीका भाजप कार्यकर्त्याने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon