मुलुंड स्थानकात लोकलमधून पडून मुंबई पोलीस हवालदाराचा मृत्यू; हृदयविकारावर मात करून नुकतेच सेवेत रुजू

Spread the love

मुलुंड स्थानकात लोकलमधून पडून मुंबई पोलीस हवालदाराचा मृत्यू; हृदयविकारावर मात करून नुकतेच सेवेत रुजू

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागताची लगबग सुरू असतानाच मुंबई पोलीस दलावर शोककळा पसरवणारी घटना समोर आली आहे. सहार वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार देविदास सस्ते यांचा मुलुंड रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. कर्तव्य बजावून घरी परतताना हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास सस्ते हे लोकल ट्रेनने कल्याणकडे जात होते. ट्रेन मुलुंड स्थानकात शिरत असताना फूटबोर्डवर उभ्या असलेल्या सस्ते यांचा अचानक तोल गेला आणि ते प्लॅटफॉर्मवर कोसळले. सोबत प्रवास करणाऱ्या सहकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

नियतीचा क्रूर खेळ म्हणजे, देविदास सस्ते हे नुकतेच गंभीर आजारावर मात करून सेवेत परतले होते. त्यांच्या हृदयात चार ब्लॉकेजेस आढळल्याने ७ ऑगस्ट ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ते वैद्यकीय रजेवर होते. कल्याण येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार आणि अँजिओग्राफी करण्यात आली होती. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते.

हृदयविकारासारख्या गंभीर संकटातून सावरल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच झालेल्या या अपघाती मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. मनमिळावू स्वभाव, साहित्य आणि वाचनाची आवड असलेले सस्ते सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुले असा परिवार आहे.

या घटनेची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, मुंबई पोलीस विभागाकडून त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत दिली जात असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon