विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू; नातेवाईकांकडून कूपर रुग्णालयात तोडफोड
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : अंधेरी पश्चिम येथील जुहू गल्लीत राहणाऱ्या सबिना शेख (४०) यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर कूपर रुग्णालयात नातेवाईकांनी तोडफोड केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. उपचारात दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातील काऊंटर व काचांवर हल्ला चढवला. या प्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सबिना शेख यांना बुधवारी (३१ डिसेंबर) रात्री विजेचा धक्का बसल्याने त्यांना सुमारे दहा वाजून तेहतीस मिनिटांनी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. शुभम ढेंबर यांनी तपासणी केल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर सबिनाचे पती मोहम्मद हनिफ जाफरअली शेख (३४) यांच्यासह एकाने डॉक्टरांशी वाद घालत धावून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून त्यांना बाहेर काढले.
त्यानंतरही रुग्णालयाबाहेर आरडाओरड सुरूच राहिली. प्रवेशद्वार, आर.ए. काऊंटर व अटेंडन्ट काऊंटरवरील काचा फोडून तोडफोड करण्यात आली. रुग्णालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची नोंद डॉक्टरांनी केली. उपचारांत दुर्लक्ष झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असला तरी प्राथमिक तपासात सबिनाला रुग्णालयात आणण्याच्या वेळीच ती मृत अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
“महिलेला तपासले तेव्हा ती मृत होती. याबाबत माहिती दिल्यानंतर नातेवाईकांनी तोडफोड केली. त्यामुळे आम्ही पोलिसात तक्रार नोंदविली आहे,” असे कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देव शेट्टी यांनी सांगितले. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.