व्हिला बुकिंगच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक; सराईत गुन्हेगार आकाश जाधवानीला वनराई पोलिसांची बेड्या
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : लोणावळ्यातील व्हिला बुकिंगचा आमिष दाखवून अनेकांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या आकाश रुपकुमार जाधवानी याला वनराई पोलिसांनी अटक केली. आकाश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून अशाच प्रकारच्या फसवणुकीचे त्याच्यावर गुन्हे नोंद असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
तक्रारदार गोरेगाव येथील असून त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी ऑगस्ट महिन्यात दोन दिवसांच्या पिकनिकचे आयोजन करण्यात आले होते. सोशल मिडीयावर व्हिला शोधताना त्यांना ‘ला राईव्ह व्हिला’ ची जाहिरात दिसली. त्यावर संपर्क साधताच निशांत अहुजा नावाच्या व्यक्तीने १५ व १६ ऑगस्ट या तारखांना व्हिला उपलब्ध असल्याचे सांगत दीड लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदारांनी रक्कम अदा केली; मात्र १४ ऑगस्टला निशांतने अचानक बुकींग रद्द झाल्याचे सांगत चार दिवसांत पैसे परत देण्याचे आश्वासन दिले.
एक आठवडा उलटूनही पैसे परत न आल्याने संशय आला. संबंधित व्यक्तीचा मोबाईलही बंद येऊ लागला. त्यानंतर तक्रारदाराने वनराई पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीसह आयटी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपी आकाश जाधवानीला जेरबंद केले.
तपासात आकाशने सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हिला बुकिंगच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचे उघड झाले. प्राप्त रकमेतून त्याने मौजमजा करत महागड्या वस्तूंची खरेदी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबईसह इतर शहरांतही अशाच गुन्ह्यांच्या तक्रारी असल्याचे समोर आले असून पुढील तपास सुरू आहे.