मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगाही कुवैतमध्ये अडकला; मुख्यमंत्री फडणवीस व पंतप्रधानांना मदतीची विनंती

Spread the love

मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगाही कुवैतमध्ये अडकला; मुख्यमंत्री फडणवीस व पंतप्रधानांना मदतीची विनंती

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : अमेरिका–इस्त्राईल–इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचा परिणाम विमान वाहतुकीवरही झाला आहे. दुबईसह अनेक आखाती देशांमध्ये हवाई सेवा विस्कळीत झाल्याने मोठ्या संख्येने भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगाही कुवैतमध्ये अडकल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भावनिक आवाहन केले आहे.

सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांचे एअर स्पेस बंद करण्यात आले असून त्याचा थेट फटका आंतरराष्ट्रीय विमानसेवेला बसला आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा काही दिवसांपूर्वी भारतात आला होता. त्यानंतर तो शिक्षणासाठी लंडनला रवाना झाला. मात्र लंडनकडे जात असताना परिस्थिती बिघडल्याने संबंधित विमानाला कुवैत येथेच उतरवण्यात आले आणि अभिनय तेथेच अडकून पडला.

याबाबत विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपली व्यथा मांडली आहे. त्या म्हणाल्या की, युद्धजन्य परिस्थितीमुळे चार दिवसांपासून मुलगा कुवैतमध्ये अडकलेला आहे. सध्या तिथे ड्रोन हल्ले आणि सतत तणावाचे वातावरण आहे, जे तो स्वतः अनुभवत आहे. विमान रद्द झाल्याने पुढील प्रवासाचा कोणताही मार्ग उपलब्ध नाही.
दरम्यान, संबंधित एअरलाईनने तात्पुरती हॉटेलची व्यवस्था केली असून कुवैतमधील भारतीय दूतावासाकडूनही मदत करण्यात येत आहे. मात्र दुबईमधून भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले, त्याचप्रमाणे कुवैतमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठीही विशेष व्यवस्था करावी, अशी कळकळीची मागणी विशाखा सुभेदार यांनी केली आहे.

“अनेक कुटुंबे आपल्या मुलांच्या सुरक्षित परतीकडे डोळे लावून बसली आहेत. कृपया आमच्या मुलांची काळजी घ्या आणि त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी मार्ग काढावा,” असे भावनिक आवाहन त्यांनी मुख्यमंत्री व पंतप्रधानांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon