उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाट्यमय घडामोडी; माजी सभागृह नेत्यांचे पत्र चर्चेत
योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे ४८ तास शिल्लक असताना पक्षांतर्गत नाराजी, घडामोडींना वेग आला आहे. अशातच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व गटनेते कैलास शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धडक लेखी पत्र पाठवून स्वतःचीच शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
‘आजच्या राजकारणात निष्ठा, कार्य, अनुभव किंवा शिक्षण यांना किंमत उरलेली नाही. आर्थिक सामर्थ्यालाच महत्त्व मिळत आहे. निवडणूक लढवण्याची क्षमता केवळ पैशावर अवलंबून आहे’, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी पत्रात नमूद केले आहे. “गुरुवर्य आनंद दिघे साहेब आणि गुरुबंधू एकनाथ शिंदे यांचे विचार मनाशी ठेवून कार्य केले, पण निवडणुकीसाठी आवश्यक आर्थिक बळ माझ्याकडे नाही. त्यामुळे तिकीट मिळण्यास मी पात्र नाही. माझ्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये म्हणून माझी हकालपट्टी करा”, अशी विनंती त्यांनी पत्राच्या शेवटी केली आहे.
शिंदे यांची ही भूमिका अनपेक्षित असल्याने शिवसेना (शिंदे गट)मध्ये खळबळ उडाली असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीत बंडाळी टाळण्यासाठी उमेदवारीवर पडदा ठेवलेल्या काळात हे पत्र चर्चेचा विषय ठरले आहे.
कैलास शिंदे हे प्रभाग क्रमांक ६१ चे माजी नगरसेवक असून कल्याण-डोंबिवली महापालिकेत सभागृह नेते, गटनेते पदं त्यांनी भूषवली आहेत. शिळरोड, कल्याण पूर्व येथील त्यांचे कार्यालय धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने कार्यरत आहे.
निवडणूक जवळ येत असताना अशा घडामोडींमुळे शिंदे यांच्या होमग्राऊंडवर राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने वळतील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.