त्र्यंबकेश्वरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकांकडून मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्याने संताप

Spread the love

त्र्यंबकेश्वरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकांकडून मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्याने संताप

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकांकडून मारहाण झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर भाविकांसह सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सध्या सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी आहे. तासन्‌तास रांगेत उभे राहूनही दर्शनासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने रांग व्यवस्थापनावरून भाविकांमध्ये नाराजी आहे. अशाच परिस्थितीत दर्शन रांगेतील नियोजनावरून एका भाविकाचा आणि तेथील सुरक्षा रक्षकांचा वाद झाला. हा वाद इतका चिघळला की सुरक्षा रक्षकांनी कायदा हातात घेत संबंधित भाविकाला मारहाण केली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुरक्षा रक्षक भाविकाला ओढत नेत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसते. या मारहाणीत भाविकाचे कपडे फाटल्याचेही व्हिडिओतून समोर आले आहे. मंदिराच्या पवित्र परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित भाविकांनी संताप व्यक्त केला असून, अशा वर्तनामुळे देवस्थानच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

यापूर्वीही मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्थेबाबत तक्रारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. श्रद्धेने दर्शनासाठी आलेल्या भक्तांशी अशा प्रकारे वागणूक दिली जात असल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोषी सुरक्षा रक्षकांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, या प्रकरणी मंदिर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon