देवनार बकरा मंडीकडे जाणाऱ्या वाहनांकडून खंडणी; इगतपुरी पोलिसांकडून तिघांना अटक
रवि निषाद / वार्ताहर
इगतपुरी : परराज्यातून शेळ्या-मेंढ्या घेऊन मुंबईतील देवनार पशुवध गृह येथील बकरा मंडीकडे जाणाऱ्या वाहनांना अडवून खंडणी उकळणाऱ्या तिघांना नाशिक ग्रामीणच्या इगतपुरी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे पशुव्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधून शेळ्या-मेंढ्या घेऊन काही ट्रक सोमवारी (२ मार्च) मुंबईकडे निघाले होते. इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिवंडी येथील नानेश्वर पाटील उर्फ नाना व त्याचे दोन साथीदार यांनी ही वाहने अडवून प्रत्येकी एक लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर तडजोड करून दोन वाहनमालकांकडून प्रत्येकी ४० हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकाराचे रेकॉर्डिंग वाहनमालक व व्यापाऱ्यांनी इगतपुरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्याकडे सादर केले. तक्रारीची दखल घेत तपास करून पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवत नानेश्वर पाटील उर्फ नाना व त्याच्या दोन साथीदारांना अटक केली.
पोलिस सूत्रांनुसार, हे आरोपी नाशिक–मुंबई मार्गावरून परराज्यातून जनावरे घेऊन येणाऱ्या वाहनांकडून दीर्घकाळापासून खंडणी घेत असल्याची माहिती आहे. आरोपींच्या अटकेनंतर देवनार येथील पशुव्यापाऱ्यांनी इगतपुरी पोलिसांच्या कामगिरीचे स्वागत केले आहे.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी व कर्मचारी, विशेषतः हेड कॉन्स्टेबल अमित भालेराव यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पोलिसांनी सांगितले.