धक्कादायक खुलासा : मालाड पश्चिमेतील ‘नोवारा क्लब’ देहव्यापार व अवैध हुक्का सेवनाचा अड्डा; आचारसंहितेचा सर्रास भंग, पोलिसांची मौनभूमिका?
मुंबई : मालाड (पश्चिम) येथील न्यू लिंक रोडवरील पॉश मानला जाणारा ‘नोवारा क्लब’ सध्या गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडला आहे. स्थानिक नागरिक व विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११ नंतर बाहेरून बंद दिसणाऱ्या या क्लबमध्ये आतल्या व्हीआयपी खोल्यांमध्ये देहव्यापार सुरू असल्याचा दावा केला जात आहे. परप्रांतीय तरुणींना ग्राहकांसाठी ‘पुरवठा’ केला जात असून, त्याचवेळी क्लबमध्ये खुलेआम अवैध हुक्का सेवनही सुरू असल्याचे आरोप आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, मोठ्या आर्थिक आमिषाने तरुणींना येथे आणले जाते. कानठळ्या बसवणाऱ्या डीजेच्या गोंगाटात हा बेकायदेशीर व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असल्याचे सांगितले जाते. बाहेरून क्लब बंद असल्याचा आभास असला, तरी उशिरापर्यंत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या आलिशान वाहनांच्या रांगा परिसरातील रहिवाशांचा संशय अधिकच बळावत आहेत.
विशेष म्हणजे, हा क्लब बांगूरनगर पोलीस ठाण्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर असतानाही रात्री पोलिस गस्तीचा ठावठिकाणा नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. क्लब मालकांकडून मोठ्या प्रमाणावर लाच देऊन कारवाई टाळली जात असल्याचे गंभीर आरोपही पुढे येत आहेत. त्यामुळे आजवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा संताप स्थानिकांमध्ये आहे.
“रात्री उशिरापर्यंत क्लबमधून बाहेर पडणाऱ्या तरुणी व ग्राहकांमुळे आमच्या परिसरातील महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्या सोसायटीसमोरच हा सगळा प्रकार सुरू असताना पोलीस डोळेझाक करत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका रहिवाशाने व्यक्त केली.
आचारसंहिता लागू असतानाही हा क्लब रोज पहाटे ३–४ वाजेपर्यंत सुरू राहत असल्याचा दावा करण्यात येतो. आत हुक्का सेवनाचा धूर आणि बाहेर संशयास्पद हालचाली सुरू असतानाही प्रशासनाची शांतता अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. मुंबईसारख्या उच्चभ्रू परिसरात सुरू असलेल्या या कथित देहव्यापार व अवैध हुक्का अड्ड्यावर तातडीने छापा टाकून कठोर कारवाई होणार का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. शहरातील कायदा-सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.