ठाकरेसेनेचा ‘हसमुख’ चेहरा हरपला; युवासेना नेता श्वेतांक तांबे याचे अकस्मात निधन

ठाकरेसेनेचा ‘हसमुख’ चेहरा हरपला; युवासेना नेता श्वेतांक तांबे याचे अकस्मात निधन

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – ठाकरेंच्या युवासेनेचा वांद्रे पूर्व विधानसभा समन्वयक श्वेतांक तांबे यांचे अपघातात निधन झाल्याचे दुर्दैवी वृत्त समोर आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा युवा नेता श्वेतांक तांबे याच्या अकस्मात निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. श्वेतांक हा ठाकरेंच्या युवासेनेचा वांद्रे पूर्व विधानसभा समन्वयक होता.सदा हसतमुख चेहरा आणि लाघवी स्वभावामुळे श्वेतांक तांबे याने सर्वांना आपलेसे केले होते. गेल्याच आठवड्यात श्वेतांकने त्याचा तिसावा वाढदिवस साजरा केला होता. मात्र अपघातात त्याचा आकस्मिक मृत्यू झाला.

श्वेतांकच्या निधनाने तरुण तडफदार कार्यकर्ता आणि सच्चा शिवसैनिक हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर श्वेतांकला श्रद्धांजली वाहताना अनेकांनी आपल्या आठवणी जागवल्या आहेत.वाटलं नव्हतं कधी श्रद्धांजली अर्पण करावी लागेल, एक निष्ठावंत शिवसैनिक आणि प्रामाणिक मित्र गेला, अशा शब्दात युवासेना नेते जय सरपोतदार यांनी हळहळ व्यक्त केली आहे.परवा रात्री एफबी लाईव्ह असणारा मित्र आज आपल्यात नाही फार दुर्दैवी घटना, असं श्वेतांकच्या मित्राने म्हटलं आहे. विशेष म्हणजे शिंदेंची शिवसेना, भाजप या पक्षातील नेते-कार्यकर्त्यांनीही शोक व्यक्त केला आहे.

या वयात तुला श्रद्धांजली देण्याची वेळ माझ्यावर येईल कधीच वाटलं नव्हतं,लवकर गेलास मित्रा, अशा भावना काही जणांनी व्यक्त केल्या आहेत.तुझा हसरा चेहरा आणि मोकळा स्वभाव कायम आठवणीत राहील. तुझी उणीव कायम भासेल, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी शोक व्यक्त केला आहे.श्वेतांकच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. आईसोबतचा ‘मूव्ही डेट’चा फोटो त्याने काही काळापूर्वी शेअर केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon