भिवंडीत एटीएम मदतीच्या बहाण्याने मजुरांची लूट; दोन जणांची २२ हजारांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात एटीएम व्यवहारात मदत करण्याच्या बहाण्याने मजुरांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपींनी दोन मजुरांकडून एकूण २२ हजार रुपये लाटल्याची माहिती समोर आली आहे.
निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत आरोपींनी एटीएम केंद्राबाहेर उभ्या असलेल्या मजुरांना लक्ष्य केले. व्यवहार करताना मदत करण्याचे आमिष दाखवत त्यांनी संबंधितांकडून बँक खात्याची माहिती, एटीएम कार्ड आणि गोपनीय तपशील मिळवले.
यानंतर या माहितीचा गैरवापर करून आरोपींनी एका मजुराच्या खात्यातून १० हजार रुपये, तर दुसऱ्या मजुराच्या खात्यातून १२ हजार रुपये स्वतःच्या खात्यात वळवले. फसवणूक लक्षात आल्यानंतर पीडितांनी तत्काळ निजामपुरा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, एटीएम व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, तसेच बँक खात्याची किंवा कार्डची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.