वर्दीतील पोलिसाचे गतीमंद महिलेसोबत अश्लील चाळे; ताडदेव पोलिसांकडून सहाय्यक फौजदाराला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या एका मैदानात वर्दीतील पोलिसाने गतीमंद महिलेसोबत अश्लील चाळे केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांनी पाहिले आणि या पोलिसाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. धक्कादायक म्हणजे मैदानाला लागूनच पोलिसांची चौकी आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून ताडदेव पोलिसांनी सहायक फौजदाराला अटक केली.
ताडदेव आरटीओकडे जाणाऱ्या साने गुरूजी मार्गावर महापालिकेचे भाऊसाहेब हिरे उद्यान आहे. लहान मुलांची खेळण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येत असतात. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एक गणवेशातील पोलिस तरूणीसोबत बसल्याचे येथील नागरिकांनी पाहिले.
काही वेळाने हा पोलिस तिच्यासोबत लगट करून अश्लील चाळे करू लागला. हा संतापजनक प्रकार पाहून नागरिक जमा झाले आणि पोलिसाला पकडून चोप दिला. पोलिस चौकी उद्यानाला लागूनच असल्याने याबाबतची माहीती कळताच ताडदेव पोलिस घटनास्थळी पोहोचले. नशेत असलेल्या या सहायक फौजदाराला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेण्यात आले.या घटनेमुळे ताडदेव परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक चौकशीत ही तरूणी गतिमंद असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सहायक फौजदार पोलिसांच्या सशस्त्र विभागात कार्यरत असून सध्या एल विभाग २ येथे नेमणूकीस आहे.