भाजप उमेदवाराच्या मुलाचा कारनामा; मद्य वाहतूक करताना पकडले, कार जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : ऊरळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारादरम्यान हडपसरमधील फुरसुंगी परिसरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या मुलासह दोघांना बेकायदा मद्य वाहतूक करताना पकडण्यात आले. या कारवाईत मद्याच्या बाटल्यांसह मोटार असा सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून निवडणूक आयोगाच्या पथकाने सोमवारी रात्री ही कारवाई केली. वेदांत राहुल कामठे (वय १९) आणि आकाश तुकाराम मुंडे (वय २४, दोघे रा. फुरसुंगी, हडपसर–सासवड रस्ता) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत सुहास गवळी (वय ३६, रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत कामठे हा भाजपचे उमेदवार राहुल कामठे यांचा मुलगा आहे. गवळी हे निवडणूक आयोगाच्या पथकात नियुक्त असून, निवडणूक काळात आचारसंहिता पालन व उमेदवारांच्या खर्चावर नजर ठेवण्याचे काम पथकाकडून केले जाते. सोमवारी रात्री फुरसुंगी परिसरातील तपासणी नाक्यावर गवळी उपस्थित असताना पुणे–सोलापूर महामार्गाकडून फुरसुंगीकडे भरधाव जाणारी एक कार थांबवण्यात आली. तपासणीदरम्यान कारमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्या.
मद्याबाबत विचारणा केली असता आरोपींनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे बेकायदा मद्य वाहतुकीचा प्रकार उघडकीस येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी आलेल्या पोलिस पथकाने मद्याच्या बाटल्या आणि मोटार जप्त केली.
फुरसुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी सांगितले की, या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, मद्याच्या बाटल्यांसह मोटार जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.