वासनांध ‘कॅप्टन’ अशोक खरातच्या अडचणीत वाढ; आणखी गुन्हे दाखल, एसआयटीमार्फत सखोल चौकशी
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक : स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणारा आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढणारा अशोक एकनाथ खरात याच्या अडचणीत लक्षणीय वाढ झाली आहे. ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने बुधवारी त्याला अटक केली असून न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पुढे राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणात अतिरिक्त गुन्ह्यांची नोंद होत असून, सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलीस ठाण्यात एका महिलेचे अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे खरातविरोधातील गुन्ह्यांची संख्या वाढून एकूण तीनवर पोहोचली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची एसआयटी प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. या पथकाकडून प्रकरणाची उच्चस्तरीय आणि सर्वंकष चौकशी केली जाणार आहे. राज्य पोलीस मुख्यालयाने संबंधित सर्व कागदपत्रे, केस डायरी आणि उपलब्ध पुरावे तातडीने एसआयटीकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तपासाच्या प्रगतीचा नियमित अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
एसआयटीकडून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राइव्हमधील व्हिडिओंचा तपास, संभाव्य इतर पीडित महिलांचा शोध, संबंधित ट्रस्टमधील आर्थिक व्यवहार तसेच आरोपीचे राजकीय व धार्मिक संबंध यांची सखोल छाननी केली जाणार आहे. या प्रकरणातील उकल पुढील तपासावर अवलंबून असल्याचे सूत्रांनी सांगितले.