५ लाखांच्या मागणीसाठी गर्भवती पत्नीचा छळ; सक्तीचा गर्भपात, ‘तिहेरी तलाक’ देत घराबाहेर हाकलले
पोलीस महानगर नेटवर्क
बीड : जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराची संतापजनक घटना उघडकीस आली असून, पाच लाख रुपयांच्या मागणीवरून गर्भवती पत्नीचा अमानुष छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सक्तीने गर्भपात घडवून आणणे, मारहाण करणे आणि बेकायदेशीरपणे ‘तिहेरी तलाक’ देऊन घराबाहेर हाकलल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.
तब्बोसूम गुलामरसूल शेख (वय २६) असे पीडितेचे नाव असून, त्यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी गेवराई येथील गुलामरसूल इब्राहीम शेख याच्याशी झाला होता. विवाहानंतर सुरुवातीचे काही महिने सुरळीत गेल्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला. नवीन गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, यासाठी तिच्यावर सातत्याने दबाव टाकण्यात येत होता.
पीडितेच्या फिर्यादीनुसार, यापूर्वी गर्भवती असताना पतीने जबरदस्तीने औषधे देऊन तिचा गर्भपात घडवून आणला होता. सध्या ती दीड महिन्यांची गर्भवती असतानाही तिला मारहाण करण्यात आली. “तुला मूल होऊ देणार नाही,” असे सांगत पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
१५ मार्च रोजी पीडितेची आई सासरी भेटायला गेली असता, मुलीच्या उपचाराबाबत विचारणा केल्याने वाद निर्माण झाला. त्यावेळी पती, सासू व नणंद यांनी संगनमताने पीडितेचे हात पकडले आणि पतीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी सासरे व नंदावा यांनी घराचा दरवाजा बंद करून धमक्या दिल्याचेही सांगण्यात आले.
यानंतर पतीने ‘तलाक’ हा शब्द तीन वेळा उच्चारत बेकायदेशीरपणे घटस्फोट दिला. तसेच तिच्या अंगावरील दागिने काढून घेत तिला घराबाहेर हाकलून दिले, असेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात पती गुलामरसूल इब्राहीम शेख, सासू अहेमदबी शेख, सासरे इब्राहीम शेख, नणंद आयेशा सय्यद आणि नंदावा मौजम सय्यद यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.