वॉरंट रद्द करण्याच्या नावाखाली लाच; जेजुरीतील पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : वॉरंट रद्द करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारासह त्याच्या ओळखीतील एका व्यक्तीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस हवालदार दशरथ शिवाजी बनसोडे (वय ५७, रा. साळुंखे इमात, मोरगाव रस्ता, जेजुरी, ता. पुरंदर) आणि सचिन अरविंद चव्हाण (रा. चव्हाण वस्ती, वाल्हा, ता. पुरंदर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका कापड व्यावसायिकाने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारदाराच्या मुलाने २०१९ मध्ये बेकायदा सावकारीप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात तक्रारदार आणि त्यांची पत्नी साक्षीदार होते. ५ डिसेंबर रोजी हवालदार बनसोडे व त्यांचा ओळखीतील चव्हाण तक्रारदाराच्या घरी गेले. तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध वॉरंट बजावले असून दोघांना पोलीस ठाण्यात हजर राहावे लागेल, असे त्यांनी सांगितले. मात्र हे वॉरंट जामीनपात्र असून ते रद्द करून देण्यासाठी दोन हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या तक्रारीनंतर एसीबीने पडताळणी केली. चौकशीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती एसीबी अधिकाऱ्यांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे करत आहेत.