परराज्यातून आलेल्या बेकायदेशीर अग्निशस्त्र विक्रेत्यास नौपाडा पोलिसांनी अटक
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : परराज्यातून बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका गुन्हेगारास नौपाडा पोलिसांनी शिताफीने अटक केली. या कारवाईत भोपाळ येथून आणलेले देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
नौपाडा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एक इसम बेकायदेशीर अग्निशस्त्र विक्रीसाठी ठाणे परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस आढळून आले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीकडून शस्त्र कुठून आणि कोणासाठी आणले होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नौपाडा पोलीस सातत्याने सजग व सतर्क राहून कारवाई करत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.