राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमचं काही देणंघेणं नाही – अमित साटम
महायुतीच्या मुंबई ‘फॉर्म्युला’तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी महायुतीने आपली कंबर कसली आहे. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये (शिंदे गट) २२७ पैकी तब्बल १५० जागांवर एकमत झाले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची घोषणा केली. महत्त्वाचे म्हणजे, या जागावाटपात सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) स्थान देण्यात आलेले नाही, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली. मुंबईचा रंग बदलण्याचा आणि मुंबईकरांच्या अस्मितेशी खेळणाऱ्यांचा या निवडणुकीत पराभव करायचा आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना थेट आव्हान दिले. मुंबईच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचाराचा विळखा तोडण्यासाठी भाजप-शिवसेना एकत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर निकाल १६ जानेवारीला लागणार आहे.
“मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डांपैकी १५० जागांवर भाजप-शिवसेनेचे एकमत झालं आहे. उर्वरित ७७ जागांवर पुढच्या दोन दिवसांत चर्चा करुन घोषणा केली जाणार आहे. मुंबई महापालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचं आहे. ही मुंबईकरांची इच्छा आहे. त्यामुळे १५० पेक्षा जास्त जागा जिंकून मुंबईकरांचा महापौर होईल. काही लोक आपल्या मतांच्या लांगुलचालनासाठी मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. तो प्रयत्न हाणून पाडण्यावर आमचं एकमत आहे. ज्या लोकांनी मुंबईत पालिकेत २५ वर्षे भ्रष्टाचार करुन मुंबई विकून खाल्ली आणि आता स्वतःचे राजकीय अस्तित्व जिवंत करण्याकरता मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत,” असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले.
मुंबई महापालिका कुठल्या एका परिवाराची जहागीर आहे हे जे समजतात त्यांना उत्तर देणे महत्त्वाचे आहे. उमेदवारांबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. धनुष्यबाण आणि कमळ दोन्ही एकच आहेत. आमच्यामध्ये आणि दुसऱ्यांमध्ये फरक हाच आहे की, एकमेकांच्या घरी गणपतीला गेलो, दीपोत्सवाला एकत्र दिसलो किंवा रक्षाबंधनाला जातो हा मुद्दा नाहीये. आम्ही मुंबईकरांची चिंता करणारे आहोत राजकारण करणारे नाहीत,” असाही टोला अमित साटम यांनी लगावला.
नवाब मलिक यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमचं काही देणंघेणं नाही. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्याच्यातून ते निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत कुठलेही संबंध ठेवणार नाही. मलिक यांच्याकडे मुंबईची जबाबदारी दिल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करणार नाही. उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली तर त्यांचे स्वागत आहे,” असं साटम यांनी म्हटलं.