आव्हाड-पडळकर समर्थकांमधील फ्री स्टाईल हाणामारी; अहवाल सभागृहात मांडणार, दोघांवरही कारवाई होणार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – पावसाळी अधिवेशनावेळी झालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीचा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला जाणार आहे. विधानभवनाच्या विशेष अधिकार हक्कभंग समितीकडून आज हा अहवाल विधानसभा अध्यक्षाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर गुरूवारी हा अहवाल सभागृहात ठेवला जाणार आहे.विशेष अधिकार हक्कभंग समितीकडून या प्रकरणी आतापर्यंत सात ते आठ बैठका झाल्या असून समितीतील १८ सदस्यांनी घडलेल्या घटनेप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. यातील संबधित व्यक्तींवर कठोर कारवाई व्हायला हवी यावर समितीतील सर्वांचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा गोपनीय अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला जाणार आहे.
गेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये विधान भवनाच्या परिसरामध्येच हाणामारी झाली होती. पडळकरांचा कार्यकर्ता सर्जेराव टकले आणि जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यामध्ये ही हाणामारी झाली होती.भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी सातत्याने शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका सुरू केली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी विधान भवनाच्या परिसरातच ‘मंगळसूत्र चोर’ अशी घोषणा दिली. एकमेकांवरील टीकेचं रुपांतर नंतर वादात झालं.
या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच विधान भवनाच्या विशेष हक्कभंग समितीकडून त्याची चौकशी करण्यात आली. त्याचा अहवाल तयार झाला असून हा अहवाल गुरुवारी सभागृहामध्ये ठेवण्यात येणार आहे.समितीच्या या अहवालानंतर राज्य शासनाकडून या प्रकरणी कठोर पावले उचलली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर किंवा स्वतः त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.