२२८ कोटींच्या कथित बँक फसवणुकीप्रकरणी जय अनमोल अंबानी यांच्याविरुद्ध सीबीआयचा गुन्हा दाखल

Spread the love

२२८ कोटींच्या कथित बँक फसवणुकीप्रकरणी जय अनमोल अंबानी यांच्याविरुद्ध सीबीआयचा गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : युनियन बँक ऑफ इंडियाच्या २२८.०६ कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि कंपनीचे संचालक रवींद्र शरद सुधाकर यांच्याही विरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे बँकेला सुमारे २२८ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

सीबीआयने युनियन बँक ऑफ इंडियाकडून (पूर्वीची आंध्र बँक) प्राप्त झालेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडने व्यवसायासाठी बँकेच्या मुंबईतील एससीएफ शाखेकडून ४५० कोटी रुपयांची क्रेडिट मर्यादा घेतली होती. या कर्जासाठी वेळेवर हप्ते, व्याज आणि इतर शुल्क भरणे, आवश्यक कागदपत्रे नियमित सादर करणे तसेच संपूर्ण विक्री रक्कम बँक खात्यामार्फत जमा करणे अशा विविध अटी घालण्यात आल्या होत्या.

मात्र कंपनीने या अटींचे पालन न करता हप्ते भरण्यात सातत्याने चूक केल्याने ३० सप्टेंबर २०१९ रोजी कंपनीचे खाते ‘नॉन-परफॉर्मिंग अॅसेट’ (एनपीए) म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर तपासात आर्थिक अनियमितता आणि कर्जाच्या अपहाराचे गंभीर आरोप पुढे आल्याने सीबीआयने हा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात जय अनमोल अंबानी यांच्याविरुद्ध सीबीआय आणि ईडीकडून गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी ऑक्टोबरच्या सुरुवातीला येस बँक – रिलायन्स समूहाशी संबंधित प्रकरणात दाखल आरोपपत्रात सीबीआयने जय अनमोल अंबानी यांच्या भूमिकेची चौकशी सुरू असल्याचे नमूद केले होते. त्या काळात ते रिलायन्स कॅपिटल आणि रिलायन्स निप्पॉनचे कार्यकारी संचालक होते.
या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon