हॉटेल, रेस्टॉरंट, पब आणि बार अग्निशमन दलाच्या रडारवर; विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबवण्याचा निर्णय
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – डिसेंबर महिन्याचा पहिला महिना उलटून गेला आहे. त्यामुळे आता जगभरातील लोकांना नवीन वर्षाचे वेध लागले आहेत. भारतातही मोठ्या उत्साहात नवीन वर्षांचे स्वागत केले जाते. अनेक लोक मद्यपान आणि पार्ट्या करतात. या काळात काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. कारण अनेक हॉटेल्स पब आणि बार नियम मोडतात. यामुळे एखादी दुर्घचना घडण्याची शक्यता असते. यामुळे आता नववर्षाच्या स्वागत समारंभांच्या पार्श्वभूमीवर दिनांक २२ ते दिनांक २८ डिसेंबर २०२५ दरम्यान मुंबई अग्निशमन दलाने ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात सर्व हॉटेल्स्, रेस्टॉरंट, पब, बारची तपासणी केली जाणार आहे.
नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी मुंबईतील अनेक हॉटेल्स्, आस्थापना, गृहसंकुल व इमारती, समुद्र किनाऱयावर व अन्य ठिकाणी कार्यक्रम, स्वागत सोहळ्यांचे आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेणे आवश्यक असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलातर्फे दिनांक २२ डिसेंबर २०२५ ते दिनांक २८ डिसेंबर २०२५ दरम्यान ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत आस्थापनांनी अग्निसुरक्षेबाबतच्या अटी व शर्ती यांचे अनुपालन केले नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ च्या तरतुदींनुसार कारवाई केली जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत सर्व हॉटेल्स्, रेस्टॉरंट, पब, बारची तपासणी केली जाणार आहे. आपात्कालिन स्थितीसाठी लागणारी उपकरणांची तपासणी केली जाणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे जर आपात्कालिन स्थिती उद्भवली तर होणारे नुकसान कमी करण्यास फायदा होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची या मोहिमेवर नजर असणार आहे.