कल्याण वाहतूक पोलिसांची मनमानी; गॅरेजमधील कारला ‘नो-पार्किंग’चा दंड

Spread the love

कल्याण वाहतूक पोलिसांची मनमानी; गॅरेजमधील कारला ‘नो-पार्किंग’चा दंड

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण – कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांच्या कारभाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कारमालकाची गाडी दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये असताना, ती भलत्याच ठिकाणी ‘नो-पार्किंग’मध्ये उभी केल्याचा ठपका ठेवत वाहतूक विभागाने त्याला थेट ई-चलन पाठवले आहे.

कल्याण पश्चिमेतील कशीस पार्कमध्ये राहणारे विलास कर्वे यांची कार बिघडल्यामुळे त्यांनी १७ ऑक्टोबर रोजी ती कल्याण पश्चिमेकडील प्रेम ऑटो परिसरातील एका नामांकित गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी दिली होती. सकाळी ९ वाजता गाडी गॅरेजमध्ये दिली आणि त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता दुरुस्त करून परत आणली. म्हणजेच, १७ ऑक्टोबर रोजी त्यांची गाडी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी नव्हती, ती दिवसभर गॅरेजमध्येच होती.

मात्र, काही दिवसांनी कर्वे यांना वाहतूक शाखेकडून एक ई-चलन प्राप्त झाले. या चलनात त्यांची कार कल्याण पूर्वेकडील पत्री पूल परिसरात ‘नो-पार्किंग’मध्ये उभी असल्याचे कारण देत ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला होता. प्रत्यक्षात आपली कार गॅरेजमध्ये असताना हे चलन आल्यानं कर्वे यांना मोठा धक्का बसला.

विलास कर्वे यांनी या चुकीच्या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितलं की, प्रश्न ५०० रुपयांच्या दंडाचा नाही, तर चुकीच्या पद्धतीने पाठवलेल्या ई-चलनाचा आहे. वाहतूक विभाग कोणतीही शहानिशा न करता थेट वाहनचालकांना ई-चलन पाठवत आहे, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. दंडात्मक कारवाईचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अशा प्रकारे ‘लूट’ केली जात आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

कर्वे यांनी वाहतूक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली. मात्र, वाहतूक विभागाने या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सत्यता पडताळण्या ऐवजी, ‘पाठवलेले ई-चलन योग्य आहे’ असे सांगून त्यांची बोळवण केली. यामुळे कर्वे यांच्या तक्रारीला कोणताही योग्य प्रतिसाद मिळालेला नाही.वाहतूक विभागाने अशा प्रकारच्या गलथान आणि चुकीच्या कारवाया तातडीने थांबवाव्यात, अशी मागणी विलास कर्वे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon