धारावीत नाडार समाजाचे आंदोलन; यूट्यूबर मुक्तार अहमदच्या अटकेची मागणी
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई : यूट्यूबर मुक्तार अहमद याने पेरुंथलैवर कामराज आणि नाडार समाजाविषयी केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यांच्या निषेधार्थ धारावीतील कुमारस्वामी कामराज शाळेसमोर मंगळवारी नाडार समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित यूट्यूबरला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान “मुक्तार अहमदला अटक करा” अशा घोषणा देण्यात आल्या. विविध नाडार संघटनांचे पदाधिकारी, महिला आणि युवकांनी यात सहभाग घेतला. पोलिसांच्या माहितीनुसार सुमारे ५०० नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
निषेधाच्या प्रतीकात्मक कृती म्हणून आंदोलनकर्त्यांनी मुक्तार अहमदच्या छायाचित्रावर चप्पल मारून संताप व्यक्त केला. त्यानंतर पेरुंथलैवर कामराज यांच्या छायाचित्रावर दूध अभिषेक करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी समाजप्रतिनिधींनी सांगितले की, “तमिळनाडूच्या सामाजिक-शैक्षणिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या कामराज यांच्यावर खोटे आरोप करणे आणि नाडार समाजाविषयी जातीय द्वेष पसरवणारी वक्तव्ये करणे हे गंभीर स्वरूपाचे कृत्य आहे.”
आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे मुक्तार अहमदविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करून अटक करण्याची मागणी केली. “अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होते. त्यामुळे कठोर कारवाई आवश्यक आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिस्थिती शांततापूर्ण राहिल्याची माहिती पोलिसांनी दिली.