ठाण्यातील गायमुख रस्त्याच्या दुरुस्तीमुळे वीकेंडला नागरिकांना मोठ्या वाहतूककोंडीची शक्यता; शुक्रवारपासून वाहतूक बदल
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाण्यातील घोडबंदरच्या गायमुख रस्त्याची दुरवस्था कायम असल्याने दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कामासाठी शुक्रवार, १२ ते १४ डिसेंबरदरम्यान या ठिकाणी डागडुजी केली जाणार आहे. त्यामुळे होणाऱ्या वाहतूक बदलाच्या पार्श्वभूमीवर ‘वीकेंडवार’ पुन्हा एकदा ‘कोंडीवार’ ठरण्याची शक्यता आहे.शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता कासारवडवली वाहतूक उपविभाग हद्दीत गायमुख नीराकेंद्र, काजूपाडा ते फाउंटन हॉटेलदरम्यान डीबीएम, मास्टिक पद्धतीने काम केले जाणार आहे. त्यामुळे रविवार, १४ डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्याबाबत ठाणे वाहतूक शाखेने अधिसूचना जारी केली आहे.
मुंबई, जंक्शनजवळून ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना वाय जंक्शन आणि कापुरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने वाय जंक्शन येथून सरळ नाशिक रोडने खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा तसेच कापुरबावडी उजवीकडे वळण घेऊन कशेळी, अंजुरफाटा या पर्यायी मार्गाने जाण्याचे आदेश वाहतूक शाखेने अधिसुचनेद्वारे दिले आहेत.
तर मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडकडे येणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी केली आहे. ही वाहने खारेगाव खाडीब्रिज खालून खारेगाव टोलनाका माणकोली, अंजूरफाटामार्गे इच्छितस्थळी जाणार आहेत.
दरम्यान, ठाणे शहरात अवजड वाहनांमुळे मोठी वाहतूककोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर भागातील रहिवाशांकडून अनेकदा संताप व्यक्त करण्यात येतो. याविरोधात घोडबंदर पट्ट्यातील गृहसंकुलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, पालघर आणि नवी मुंबई पोलिस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेत या बैठकीत अवजड वाहतुकीवर नियंत्रणाच्या सूचना दिल्या होत्या. आता घोडबंदरवरील गायमुख रस्त्याची दुरुस्ती सुरू झाल्यानंतर या भागातील नागरिकांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.